नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यामुळे आज बहूमत चाचणी पार पडली नाही. त्यावर मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ सिंह यांना 17 मार्चला बहूमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
'तुम्ही (कमलनाथ) लिहलेल्या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. मात्र, सद्यपरिस्थितीमध्ये ते लागू होत नाही. त्यामुळे संविधानाचा आदर करत तुम्ही 17 मार्चला बहूमत चाचणी घ्यावी आणि बहूमत सिद्ध करावे, असे न केल्यास तुमच्याकडे बहूमत नसल्याचे मानण्यात येईल' , असे राज्यपाल लालजी टंडन पत्रामध्ये म्हटले आहे.
मध्य प्रदेशच्या विधानसभेत आज बहुमत चाचणी घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यावर राज्यपाल यांनी पुन्हा पत्रक जारी करत कमलनाथ यांना 17 मार्चला बहूमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. आमदारांनी राजीनामे दिल्याने मुख्यमंत्री कमलनाथ सरकारवर संकट आले असून यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.