भोपाळ : मध्य प्रदेशात ३ नोव्हेंबरला २८ जागांवर पोटनिवडणुका पार पडल्या. या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मध्य प्रदेशात शिवराज सिंह यांचे सरकार टिकणार, की पुन्हा कमलनाथ यांचे सरकार येणार हे या निवडणुकांच्या निकालावर ठरणार आहे.
काय आहे गणित?
मध्य प्रदेश विधानसभेमध्ये सध्या १०७ जागा भाजपच्या आहेत, तर काँग्रेसकडे ८७ जागा आहेत. तसेच, दोन बसपा आणि एक सपा आमदार आहेत. मध्य प्रदेश विधानसभेत २३० जागा आहेत. त्यांपैकी एक रिक्त आहे. बहुमतासाठी ११५ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपला या पोटनिवडणुकीत केवळ आठ जागा जिंकण्याची गरज आहे. काँग्रेसला मात्र बहुमतात येण्यासाठी पूर्ण २८ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे या पोटनिवडणुका केवळ उभ्या असलेल्या उमेदवारांचेच नव्हे, तर संपूर्ण मध्य प्रदेश सरकारचे भवितव्य ठरवणार आहेत.
एक्झिट पोल्स भाजपकडून..
अॅक्सिस माय इंडियाने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला १६ ते १८ जागा, तर काँग्रेसला १० ते १२ जागांवर यश मिळणार आहे. म्हणजेच, शिवराज सिंह यांचे सरकार टिकण्याची शक्यता आहे.
तर, भास्करच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला १४ ते १६, तर काँग्रेसला १० ते १३ जागा मिळण्याची शक्यता आहे.
निकालास होणार उशीर..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी करण्यासाठी एका कार्यालयात केवळ सात टेबल लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एका टेबलवर केवळ एक कर्मचारी बसेल. यामुळे मतांच्या मोजणीसाठी लागणारा कालावधी वाढणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : 'भाजप सरकारने अनेक घरे उद्धवस्त केली' राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल