नवी दिल्ली - भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात एकूण ७७ हजार २६६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. या रुग्णांसह देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३३ लाख ८७ हजार ५०१ वर पोहोचला आहे.
देशात कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेदिवस वाढतच आहे. त्याच बरोबर दररोजचा मृतांचा आकडाही हजारच्या पुढे जात आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनामुळे तब्बल १ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. या आकेडवारीसोबत देशातील एकूण मृतांचा आकडा हा ६१ हजार ५२९ इतका झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर सध्य स्थितीत ७ लाख ४२ हजार २३ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात सध्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येने सात लाखाचा टप्पा पार केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी १४ हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी राज्यात १४ हजार ७१८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ९१३६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७२.४६ टक्के झाले.