नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर जागतिक महामारी कोरोना विषाणूचा देखील परिणाम झाला आहे. परंतु, अधिवेशन यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी सरकारकडून पूर्ण तयारी केली जात आहे. लवकरच संसदेचे पावसाळी अधिवेशन होईल. सर्व खबरदारीसह पावसाळी अधिवेशन घेण्यात येईल, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.
यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदस्यांच्या सरचिटणीसांना पावसाळी अधिवेशनासाठी आवश्यक ती तयारी करण्यास सांगण्यात आले होते. तसेच संसदेच्या अधिवेशनात खासदारांच्या उपस्थितीदरम्यान सामाजिक अंतराचे प्रमाण लक्षात ठेवण्यास सांगितले होते.
दरम्यान मार्चच्या सुरूवातीला दोन्ही सभागृहात 19 विधेयके (लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 1) सादर करण्यात आली. वित्त विधेयक मंजूर करण्यासह अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही सभा तहकूब करण्यात आल्या होत्या.
1 जूनला राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.