वॉशिंग्टन - काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थितीवर पंतप्रधान मोदी, ट्रम्प यांच्याशी लवकरच बोलणार असल्याची शक्यता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रादेशिक तणाव आणि स्थानिक नागरिकांचे हक्क यावर दोघांमध्ये चर्चा होणार आहे, जी ७ बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली.
सीमेपलीकडून भारतामध्ये सातत्याने होणारी घुसखोरी थाबंवण्यात यावी. तसेच जे दहशतवादी गट भारतामध्ये हल्ला घडवून आणत आहेत, त्यांना मदत करण्याचे थांबवण्यात यावे, असे ट्रम्प पाकिस्तानला सांगणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याबाबत वक्तव्य करत आहेत. मात्र, भारताने याआधीच मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला आहे. काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून यामध्ये कोणीही मध्यस्थी केलेली चालणार नाही. जरी चर्चा झाली तरी ती पाकिस्तानशी होईल असे भारताने स्पष्ट केले आहे. काश्मीरमधील स्थिती स्फोटक झाली असल्याचे ट्रम्प यांनी याआधी म्हटले आहे. भारत पाकिस्तान हे आपले चांगले मित्र असून दोघांनी संयमाने परिस्थिती हाताळावी, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.