नवी दिल्ली - कोरोनाचा कहर पाहता, आपापल्या आर्थिक लक्ष्यांपेक्षा नागरिकांना वाचवण्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी सर्व देशांना केले. ते 'जी-२०' देशांना संबोधित करत होते.
कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर जी-२० देशांची व्हर्च्युअल शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी नव्या आपत्ती व्यवस्थापन प्रोटोकॉलची कल्पना सुचवली. तसेच, जागतिक स्तरावर परिणामकारक औषधांच्या निर्मितीसाठी जागतिक आरोग्य संघटना गरजेची आहे, त्यामुळे अशा संस्थांची क्षमता वाढवण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जगभरात सुमारे २१ हजार लोकांचा बळी घेतलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जी-२० देशांनी एकत्र यायला हवे. आपल्या सहकारी देशांवरील विशेषतः गरीब देशांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी, आपण सर्वांनी एकत्रितपणे पावले उचलायला हवीत. तसेच, संपूर्ण मानवजातीच्या आरोग्यासाठी नव्या प्रकारच्या जागतिकीकरणाची गरज आहे. वैद्यकीय संशोधन हे सर्वांसाठी मोफत आणि मुक्तपणे उपलब्ध असायला हवे, असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले.
हेही वाचा : आता गोळ्या-औषधांचीही मिळणार होम डिलिव्हरी!