नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज संसदीय नेत्यांची 'व्हर्च्युअल' बैठक घेणार आहेत. आज सकाळी ११ वाजता ही बैठक होईल. लॉकडाऊनसोबतच इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर यात चर्चा होणार आहे.
या बैठकीचा मूळ उद्देश लॉकडाऊनविषयी निर्णय घेणे हा राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिलपर्यंत आहे. त्यानंतर हा लॉकडाऊन उठवायचा, सुरू ठेवायचा की, शिथील करायचा याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल.
या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. तर सरकारचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधानांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, थावर चंद गेहलोत, प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या नेत्यांसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, समाजवादी पक्षाचे प्रा. राम गोपाल यादव, बहुजन समाज पक्षाचे दानिश अली आणि सतीश मिश्रा, तसेच बिजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा हे उपस्थित असणार आहेत.
हेही वाचा : अनंतनागमधील हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली