जयपूर - राजस्थान काँग्रेस महासचिव सुशील शर्मा यांनी 'चांद्रयान-2 च्या अपयशाला मोदीच जबाबदार आहेत,' असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'चांद्रयान-2 मोहिमेत पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे शास्त्रज्ञांच्या कामामध्ये व्यत्यय आला. यामुळेचे चांद्रयान-2 मोहिमेला अंतिम टप्प्यात अपयश आले,' असे ते म्हणाले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना काँग्रेसमधूनच टीकेचा सामना करावा लागत आहे.
काँग्रेसचे मंत्री प्रतापसिंह यांनी पक्षाची बाजू स्पष्ट करत सुशील शर्मा यांना फटकारले आहे. 'मोठे नेते अशा कार्यक्रमांना जातात. ही जुनी परंपरा आहे. यावर राजकारण करणे योग्य नाही. काँग्रेस शास्त्रज्ञांच्या सोबत आहे. त्यांनी चांगले काम केले आहे. हा काँग्रेस किंवा भाजपचा मुद्दा होऊ शकत नाही. हा देशाचा मुद्दा आहे. शास्त्रज्ञ चांगले काम करत आहेत. त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. त्यामुळे देशभरातील काँग्रेस शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत आहे. चांद्रयान सफल झाले पाहिजे. आज ना उद्या ते होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे,' असे प्रतापसिंह म्हणाले.
हेही वाचा - दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर भारताला मिळणार पहिलं राफेल विमान
चांद्रयान-2 मोहिमेला अंतिम टप्प्यात अपयश आले. याची कारणे काहीही असोत. मात्र, यावर राजस्थान काँग्रेसचे महासचिव सुशील शर्मा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शर्मा यांनी chandrayaan-2 च्या अपयशासाठी पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 'भाजप नेते केवळ बोलण्याचे काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही मोहीम पूर्ण होण्याआधी इस्रोच्या परिसरात गेले नसते, तर chandrayaan-2 ला नक्की यश मिळाले असते. पंतप्रधान मोदी तेथे आपला नंबर आधी लावण्याचे राजकारण करण्यासाठी पोहोचले नसते तर, शास्त्रज्ञांच्या कामात व्यत्यय आला नसता. त्यांचे लक्ष विचलित झाले नसते. शास्त्रज्ञांना जे काम शेवटच्या टप्प्यात करायचे होते, ते होऊ शकले नाही. आज संपूर्ण जगासमोर chandrayaan-2 अभियान 95% सफल झाले आहे. 100 टक्के नाही. राजकारण न करता शास्त्रज्ञांना त्यांचे काम लक्षपूर्वक करू दिले असते, तर ही मोहीम सफल झाली असती,' असे ते म्हणाले. या वक्तव्यानंतर सुशील शर्मा यांना पक्षातील इतर नेत्याकडून टीकेचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा - उत्तरप्रदेशातील 'या' पोलीस ठाण्यात १९ वर्षांत फक्त २ गुन्ह्यांची नोंद