एजॉल (मिझोरम) - भारतात जवळपास सर्वच राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचे रोज नवनवीन रुग्ण आढळून येत असून मृत्यूही होत आहेत. मात्र, मिझोरम राज्यात आज पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
मिझोरम राज्यात एका ६२ वर्षीय व्यक्तीचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने याबाबत माहिती दिली आहे. मिझोरममधील कोरोनाचा झालेला पहिला मृत्यू संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का आहे, असे ट्विट माहिती व जनसंपर्क विभागाने केले आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 374
निवेदनात म्हटले आहे की, 62 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीवर झेडएमसी रुग्णालयात गेल्या 10 दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आले. बुधवारपर्यंत मिझोरममध्ये कोरोना विषाणूची 2,607 प्रकरणे आढळली आहेत. आतापर्यंत 2,233 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील सक्रिय प्रकरणांची संख्या 374 आहे.
कोरोनाबाधितांची संख्या भारतात कमी होत असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतातही लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
मिझोरम हे देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मिझोरमच्या उत्तरेस आसाम, ईशान्येस मणिपूर, पश्चिमेस त्रिपुरा ही राज्ये तर पूर्वेस व दक्षिणेस म्यानमार व पश्चिमेस बांगलादेश हे देश आहेत. ऐझॉल ही मिझोरमची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मिझोरम राज्याची स्थापना १९८७ साली आसाम राज्याला विभागून केली गेली. त्याचे एकूण क्षेत्रफळ २१,०८१ चौ.किमी एवढे आहे तर लोकसंख्या १०,९१,०१४ एवढी आहे.