बारी (धौलपूर)- राजस्थानमध्ये बारी उपविभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही नराधमांनी एका विवाहित महिलेशी गैरवर्तन केले. याचा विरोध केल्यानंतर नराधमांनी महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच आजूबाजूचे लोक गोळा झाल्यानंतर आरोपी पळून गेले. या प्रकरणानंतर सुमारे 6 तासांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणावरून जिल्ह्यातील गुन्हेगारांना पोलिसांची भीती नसल्याचे स्पष्ट होते. बारी शहरातील गुमाट येथे पोलीस स्टेशनजवळ हा सर्व प्रकार घडला आहे. त्या ठिकाणी लोकांची गर्दी असूनही आरोपींनी महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा-TOP 10 @11 AM : सकाळी 11 वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडी
काही लोकांनी या नराधमांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते महिलेला सोडून चारचाकीतून फरार झाले. ही घटना बारी पोलीस स्टेशनला कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ महिलेला पोलीस ठाण्यात आणले. तब्बल 6 तासांनंतर पोलिसांनी महिलेच्या सांगण्यानुसार तक्रार नोंदवली; आणि तपास सुरू केला.