नवी दिल्ली - रविवारी राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. यामुळे नाथूपुरा भागात राहणाऱ्या शेकडो मजूरांची घरे उद्ध्वस्त झाली. आता राहण्यासाठी ठिकाणा नसल्याने या मजुरांनी पायी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील हे मजूर दिल्लीत बांधकाम व्यावसायिकांसाठी काम करतात. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे मागील दीड महिन्यांपासून काम नाही. एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या अन्न-धान्यावर हे मजूर आपली उपजिवीका करत होते. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने मजूरांनी दिल्लीतच थांबण्याला प्राधान्य दिले होते. मात्र, आता त्यांचा निवाराही वादळात नाहीसा झाल्याने त्यांनी पायी घरचा रस्ता धरला आहे.
"आमची घरे वादळामुळे नष्ट झाली असून मदतीसाठी कोणीही नाही. सरकार आणि सेवाभावी संस्थांनी अन्न-धान्य दिले मात्र, ते पुरेसे नाही. आमच्या आहारात चपाती आणि भाजी अनिवार्य आहे. लॉकडाऊनमुळे ते मिळत नाही, म्हणून आता घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे", अशी प्रतिक्रिया एका मजूर महिलेने दिली.
दरम्यान, घरचा प्रवास करत असताना बुरारी येथे पोलिसांनी मजूरांच्या या जथ्याला अडवून त्यांची चौकशी केली. त्यांना पुन्हा नाथुपुरा येथे आणून पोलिसांनी त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय केली.