बंगळुरु - कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मनोरुग्ण व्यक्तीला कुटुंबीयांनी तब्बल 10 वर्ष घरात साखळीने बांधून ठेवले आहे. ही घटना जिल्ह्यातील बाईलहोंगल तालुक्यातील हन्निकेरी गावातील आहे.
विठ्ठल भलागन्नवारा असे या मनोरुग्णाचे नाव आहे. त्याला एका पडक्या घरातील अंधाऱ्या खोलीत मागील 10 वर्षांपासून साखळीने बांधून ठेवले आहे. घराशेजारून आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना विठ्ठल दगड फेकून मारायचा तसेच कधीकधी अचानक हल्लाही करायचा. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला घरात बांधून ठेवले.
मागील 10 वर्षांपासून त्याला नग्न अवस्थेत ठेवण्यात आले आहे. तसेच कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. विठ्ठलच्या मानसिक आजारामुळे त्याचे कुटुंबीयही चिंतेत आहेत. दहा वर्षांपूर्वी विठ्ठल बंगळुरुतील एका हॉटेलात काम करत होता. मात्र, तेथून माघारी आल्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागली, आणि तो मनोरुग्ण झाला, असे त्याच्या आईने सांगितले. या प्रकरणी प्रशासनाने अद्याप कारवाई केली की नाही याबाबत माहिती मिळाली नाही.