लखनऊ - मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी कृष्ण मंदिर दसऱ्याच्या मूहुर्तावर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. कोविड नियमावलीचे पालन करत भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. २२ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद होते.
ऑनलाईन नोंदणीची सुविधा
विजयादशमी असल्याने भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत. मात्र, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आम्ही दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था सुरू केली आहे. एका दिवशी फक्त ५०० भाविकांना प्रवेश देण्यात येईल, असे मंदिर अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना नियमावलीचे पालन अनिवार्य
१५ ऑक्टोबरपासून मंदिर खुले करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले होते. मंदिर उघडल्यानंतर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे १९ तारखेला मंदिर बंद करण्यात आले होते. आता पुन्हा कृष्ण मंदिर सुरू करण्यात आले आहे. कोरोना नियमावलीचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी मंदिरात उपस्थित आहेत.