हा त्रास असणारे लोक पोटदुखी, सूज, गॅस, अतिसार आणि बद्धकोष्ठता यांची तक्रार करत असतात. काही जण आपला आहार, जीवनशैली आणि तणाव यावर नियंत्रण ठेवून या त्रासावर मात करतात. याबद्दलच ई भारत सुखीभवने वंदना काकोडकर यांच्याशी बातचीत केली.
वैद्यकीय भाषेत याला इरिटेबल बाऊल सिंड्रम ( आयबीएस ) म्हणतात. त्याची लक्षणे अशी –
- अन्न – अनेकांना ठराविक प्रकारचे अन्न सेवन केले किंवा पेय प्यायले तर आयबीएसच्या लक्षणांना सामोरी जावे लागते. यात गहू, दुग्धजन्य पदार्थ, लिंबूजन्य फळे, सोयाबिन, दूध आणि कार्बोनेटेड पेय यांचा समावेश असतो.
- तणाव – तणावाच्या वेळी लोकांना आयबीएसची लक्षणे तीव्र प्रमाणात दिसतात. तणावामुळे ही लक्षणे वाढू शकतात, पण ते कारण असू शकत नाही.
- हार्मोन्स – स्त्रियांमध्ये आयबीएसचा त्रास असण्याची शक्यता दुप्पट असते. म्हणूनच हार्मोन्सचा बदल याला कारणीभूत होतो, हे दिसून आले आहे. अनेक स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान या त्रासाला तोंड देतात.
पोषक आहार – आयबीएसमध्ये आहार हा खूप महत्त्वाचा असतो. अनेक जणांना आपल्या आहारातून लॅक्टोज, उच्च दर्जाचे फ्रुक्टोज, ग्लुटेन ( गव्हात ते जास्त असते ) वगळणे गरजेचे आहे. यामुळे पोषक द्रव्य कमी होतात.
हेही लक्षात आले आहे की, काही जणांना सफरचंद, आंबा, नासपती, कलिंगड ही फळे किंवा कोबी, फुलकोबी अशा भाज्या खाऊन ही लक्षणे दिसतात.
काही पदार्थ आहारातून काढून टाकताना काळजीही घेतली पाहिजे. कारण यामुळे कमतरता येण्याची शक्यताही असते.
कार्बोहायर्डेड – तांदूळ, ओट, क्विनोआ, मका, ज्वारी यांचे सेवन तुम्ही करू शकता. पण गहू, बार्ली शक्यतो टाळा.
प्रोटिन्स – अंडी, चिकन, मासे, मूग डाळ, तूर डाळ, हिरवे हरभरे, वाटाणे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ठीक आहे. दही आणि ताक चांगले असते. पण लाल मांस, प्रक्रिया केलेले मांस, चणाडाळ, लेंटिल्स आणि लॅक्टोज असलेले दूध आणि दुधासारखे पदार्थ यांचे सेवन करू नका.
चरबी – तेल, तूप मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. पण एवोकॅडो, बदाम आणि पिस्ता यांचे सेवन टाळा.
जीवनसत्वे आणि खनिजे – कोबी, फुलकोबी, कांदा, लसूण, बिन्स यांचा वास तीव्र असतो. यामुळे लक्षणे वाढतात. तेव्हा या पदार्थांचे सेवन करू नका. पण गाजर, हिरव्या पालेभाज्या, बटाटे, गोड बटाटे इत्यादी यांचे सेवन सूक्ष्म पोषक घटकांसाठी करणे आवश्यक आहे.
द्राक्षे, स्ट्रॉबेरी, अननस, पपई, केळी यांसारखी फळे तुम्ही कितीही खा, पण सफरचंद, नासपती, आंबा, कलिंगड ही फळे मर्यादितच खा.
फायबर – आतड्यांचे विकार असणाऱ्यांना तंतूमय पदार्थ ही दुधारी तलवार आहे. फायबरमुळे बद्धकोष्ठता जाते. पण टरफलासारख्या फायबरमुळे गॅस होतो आणि सूजही येऊ शकते.
पाण्यात विरघळणारे फायबर्स
- या फायबरमध्ये पाणी शोषणाची क्षमता आहे. हे तंतू जेल निर्माण करणारे पाणी शोषून घेतात आणि आतड्यात स्पंजसारखे काम करतात. यामुळे अन्नाचे पचन होण्याचे प्रमाण कमी होते आणि ग्लुकोजचे शोषण उशिरा होते.
- यामुळे पोटात अन्न बराच काळ राहते. आणि पोट भरले आहे असेच वाटत राहते.
- ते रक्तातले काॅलेस्ट्राॅल नियंत्रणात ठेवतात. यात मलातून जास्तीचे काॅलेस्ट्राॅल उत्सर्जित होते.
- हे तंतू फळे आणि भाज्या, ओट्स, शेंगा, कडधान्ये, डाळ, अंकुर, चिया बियाणे, फ्लॅक्ससीड्स, ईसबगोल यात आढळतात. आयबीएसचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने वर सांगितलेली ठराविक फळे आणि डाळी खाऊ नयेत.
न विरघळणारे फायबर्स
- हे तंतू पाण्यात विरघळत नाहीत. ते झाडूसारखे काम करतात. आतडे साफ करतात. पाणी शोषून घेतात आणि नको असलेले पदार्थ मलावाटे काढून टाकतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि मोठ्या आतड्याचा कर्करोगाला आळा बसतो.
- हे फायबर्स फळांच्या साली, भाज्या, संपूर्ण धान्य, बाजरी आणि शेंगदाणे यात आढळतात.
व्यक्तीला काय लक्षणे आहेत, म्हणजे अतिसार आहे की बद्धकोष्ठता, यावरून फायबर्सची निवड करून सेवन करता येईल. अर्थात, कृपया तुमच्या डाएट प्लॅनसाठी आहार तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या.
वंदना काकोडकर, कन्सल्टंट आहार तज्ज्ञ, एमईएस कॉलेजमधील व्हिजिटिंग प्राध्यापक, जीईपीआरडीच्या रिसोर्स पर्सन, त्या नेस्ले, सेसा गोवा, एमआरएफ तसेच गोव्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांसाठी नियमित प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करतात.