हैदराबाद : बोनालू उत्सव तेलंगाणा राज्यामध्ये जल्लोषात साजरा केला जातो. महाकाली देवीची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाकाली देवीची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. सगळीकडे भक्तीमय आणि जल्लोषाचे वातावरण असते. हैदराबादमध्ये मिरवणुकीवेळी एका उत्साही भाविकाला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. या भाविकाने चक्क पोलीस अधिकाऱ्याचे चुंबन घेतले. त्यामुळे हा अधिकारी काही काळ गांगारुन गेला.
बोनालू उत्सवाला आषाढ जत्राही म्हटले जाते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. मिरवणूकी वेळी पोलिसांचा बंदोबस्त असतो. नाचत असताना एका बेभान भाविकाने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे चुंबन घेतले. या भाविकाने अचानकपणे अधिकाऱ्याला मिठी मारली आणि चुंबन घेतले. त्यामुळे अधिकारी गांगारुन गेला. अधिकाऱयाने या भाविकाच्या कानशिलातही लगावली. हा अतिउत्साही भाविक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली.
या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी चित्रीत केला आहे. बंदोबस्तावर असलेल्या दुसऱ्या एका अधिकाऱयाने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. त्यामुळे हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरला आहे.