दुर्ग - किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या भांडणात छत्तीसगडमधील एका व्यक्तीने पत्नीचा खून केला तर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना दुर्ग जिल्ह्यातील छावाणी गावात घडली. अवघ्या ५० रुपयांवरून सुरू झालेल्या भांडणातून पत्नीचा अंत झाला.
लोखंडी रॉडने पत्नीची हत्या -
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार पटेल (४०) नामक व्यक्तीने पत्नीकडे ५० रुपये मागितले होते. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. या छोट्याशा कारणावरून दोघांत भांडण सुरू झाले. रागाच्या भरात राजकुमारने पत्नी अनिता (३५) ला मारहाण सुरू केली. तरीही त्याचा राग शांत झाला नाही. जवळच पडलेला लोखंडी रॉड त्याने पत्नीच्या डोक्यात घातला. यात पत्नीचा मृत्यू झाला.
हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न -
पत्नीची हत्या केल्यानंतर राजकुमारनेही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारी राहणाऱ्यांना घरातील आरडाओरडा ऐकू आल्याने ते धावत आले. त्यांनी राजकुमारला दवाखान्यात दाखल केले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोघांमध्ये सतत भांडण होत असल्याची माहितीही मिळत आहे. या प्रकरणी छावाणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.