रामपूर (उत्तर प्रदेश) - सॅनिटायझर फवारणी करणाऱ्या एका तरुणाची भोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या करण्यात आली. मारहाण करून त्याच्या तोंडात सॅनिटायझर घालण्यात आले. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुण गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची फवारणी करीत होता, त्यावेळी तेथून जाणाऱ्या दुसर्या एकाच्या पायावर सॅनिटायझर पडले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद चांगलाच वाढल्यानंतर तरुणाने इतर मित्रांना बोलावून फवारणी करणाऱ्या तरुणाची हत्या केली. मृताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे, की गावचे प्रधान आणि त्याच्या साथीदारांनी हे कृत्य केले आहे.
या तरुणाची तोंडात फवारणी स्प्रे घालून हत्या करण्यात आली. मारहाण प्रकारानंतर घटनास्थळावरून त्याला रुग्णालयात दाखल करत तातडीने अतिदक्षता विभागात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृताचा भाऊ नरेशनेही आरोप केला आहे की, प्रधान इंद्रपाल याने माझ्या भावाच्या तोंडात कीटनाशक घालून त्याची हत्या केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.