कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंपूर्ण भारत अभियानासाठी २० लाख कोटी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यामुळे थेट लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचणार असल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी आनंदी नाहीत, असे पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.
कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वत: बॅनर्जी यांनी मोदींकडे १० लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मागितले होते. आता केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. मात्र, अद्याप त्या नाराज आहेत, असे घोष म्हणाले.
पॅकेजचे खरे लाभार्थी असलेल्या सामान्य लोकांच्या खात्यात कोणत्याही मध्यस्थीविना थेट ऑनलाईन रक्कम देण्यात येणार आहे. यामुळे कदाचित त्यांना राग येत असेल, असेही ते म्हणाले.
बँनर्जी यांनी गरीब मजुरांना त्यांच्या खिशातून रेल्वेचे भाडे देण्यास भाग पाडले. ते योग्य आहे का? एका विशिष्ट समुदायाच्या यात्रेकरूंना परत आणण्यासाठी दोन गाड्या आणि अडकलेल्या मजुरांना आणण्यासाठी फक्त आठ गाड्यांची व्यवस्था केली, अशी टीका त्यांनी केली. ममता बॅनर्जी स्वत: जातीयवादाला उत्तेजन देतात, असेही ते म्हणाले.
दरम्यान आर्थिक पॅकेजवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं पॅकेज दुसरं काही नसून एक मोठा भोपळा आहे. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत त्यांची दिशाभूल केली जात असून असंघटित क्षेत्र तसंच रोजगार निर्मितीसाठी या पॅकेजमध्ये काहीच नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या.