नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज (शुक्रवार) सहा राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ममता यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं बंगालला उद्ध्वस्त केल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी केंद्राच्या पीएम किसान योजनेचा लाभ बंगालच्या ७० लाख शेतकऱ्यांना मिळू दिला नाही. या विषयाचं त्यांनी राजकारण केलंय. या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला ६ हजार रुपये देण्यात येतात, असेही पंतप्रधान म्हणाले.
विरोधात आंदोलन का होत नाही ?
येत्या काही महिन्यांत बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन होत आहे. मात्र, बंगालमध्ये पीएम किसान योजना लागू सरकार लागू होऊ देत नाही, या विरोधात का आंदोलन होत नाही? यावरून मोदींनी आश्चर्य व्यक्त केले.
बंगालचे सत्तर लाख शेतकरी योजनेपासून वंचित
बंगालमधील सुमारे ७० लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. ही योजना पूर्णपणे केंद्र पुरस्कृत आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालला उद्ध्वस्त केलं आहे. बंगाल हे एकमेव राज्य आहे, जेथे ही योजना लागू नाही. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ रोखून ममता राजकारण करत आहेत. शेतकरीविरोधी त्यांच्या भूमिका माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे. विरोधक यावर का गप्प आहेत, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.
ममता सरकारच्या विचारधारेनं राज्याचे नुकसान
बंगालमधील २३ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र, बंगाल सरकारने पडताळणी थांबवली. जर तुम्ही १५ वर्षांपूर्वीची ममता बॅनर्जी यांनी भाषणे ऐकालं तर तुम्हाला समजेलं त्यांनी किती राज्याचं नुकसान केलं आहे. जनता हे सर्व पाहत आहे. जे पक्ष बंगालमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत नाहीत, ते आता दिल्लीकरांना सतावत आहेत, असे म्हणत त्यांनी डाव्या पक्षांवर निशाणा साधला.