बडवाणी - देशाच्या हृदयाच्या स्थानी असलेल्या मध्यप्रदेशाविषयी राष्ट्रपिता महात्मा गांधींना अत्यंत आपुलकी होती. दिल्लीशिवाय येथेही महात्माजींची दुसरी समाधी बांधलेली आहे. येथे गांधीजींसह त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांची खासगी सचिव यांच्या अस्थींचे स्मारक आहे.
संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या गांधीजींच्या जयंती आणि पुण्यतिथीला दिल्लीमधील त्यांच्या समाधीस्थळी राजघाटावर अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन पोहोचतात. मात्र, दिल्लीतील राजघाटाशिवाय मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात कुकरा बसाहट गावातही गांधीजींचे समाधीस्थळ आहे. हे राजघाटानंतरचे त्यांचे दुसरे समाधीस्थळ आहे. 2017 मध्ये पूरक्षेत्रात येत असल्यामुळे प्रशासनाने ते कुकरा बसाहटमध्ये विस्थापित केले होते.
नर्मदा नदी किनाऱ्यावरील कुकरा गावात हे देशातील असे एकमेव स्थान आहे, जेथे तीन महान व्यक्तींच्या समाधी एकाच ठिकाणी आहेत. जानेवारी 1965 मध्ये गांधीजींचे अनुयायी काशीनाथ त्रिवेदी यांनी गांधीजी, त्यांच्या पत्नी कस्तूरबा आणि गांधीजींचे सचिव महादेवभाई देसाई यांच्या अस्थी घेऊन नर्मदेच्या काठी या ऐतिहासिक समाधीची पायाभरणी केली होती. हे समाधीस्थळ 12 फेब्रुवारी 1965 ला तयार झाले. याला राजघाट हेच नाव देण्यात आले. मात्र, हे ठिकाण काहीसे दुर्लक्षित राहिल्यामुळे गांधीजींच्या जयंती आणि पुण्यतिथीवेळी येथे बहुतांशी सामसूमच असते.