भोपाळ (मध्य प्रदेश) - भाजप नेते बालेंदू शुक्ला यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. शुक्ला यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बालेंदू शुक्ला यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी आधी पक्ष का सोडला होता याबाबत बोलण्याला अर्थ नाही. आम्ही त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली. तसेच अजून खूप जण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत, असेदेखील ते म्हणाले.
शुक्ला यांनी २००९ मध्ये ज्योतिरादित्य सिंधियांसोबत मतभेद झाल्यानंतर पक्ष सोडला होता. तर सिंधियांच्या भाजप प्रवेशाने नाराज असल्याने शुक्ला यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे. राज्यातील आगामी निवडणुकीत शुक्ला यांच्या घरवापसीचा फायदा होईल, अशी काँग्रेसला आशा आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष सोडल्यानंतर २२ आमदारांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजपचे शिवराज सिंग चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.