डेहराडून - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी आयएएस अधिकारी उत्पल कुमार सिंह यांची लोकसभेच्या सरचिटणीस (महासचिव) पदी नियुक्ती केली आहे. कॅबिनेट सचिव पदाचा दर्जा सिंह यांना देण्यात आला आहे. आज १ डिसेंबर रोजी त्यांनी कार्यभार हाती घेतला. उत्पल कुमार सिंह यांनी उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
उत्पल कुमार सिंह १९८६ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. कार्यक्षम आणि धडाडीच्या अधिकाऱ्यांत सिंह यांची गणना होते. उत्तराखंड राज्याच्या मुख्य सचिवपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना लोकसभा सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. ३० नोव्हेंबरला सरचटणीस स्नेहलता श्रीवास्तव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्पल कुमार सिंह यांचा कार्यकाळ कसा होता?
सिंह यांनी आपल्या ३४ वर्षांच्या सेवेत उत्तरप्रदेशातील मुजफ्फरपूर आणि आजमगढ या आव्हानात्मक जिल्ह्यात काम केले आहे. तसेच उत्तराखंड राज्यातील डोंगराळ भागातल्या जिल्ह्यातील कार्यभार सांभाळला आहे. जून २००० मध्ये सिंह यांची नियुक्ती कुमांऊ विकास परिषदेच्या मुख्य संचालकपदी झाली. उत्तराखंड राज्याच्या स्थापनेनंतर नैनिताल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. तेथे एक वर्ष काम केल्यानंतर त्यांची बढती सचिवपदी झाली. २००२ साली ते गढवाल विभागाचे मुख्य संचालक म्हणून नियुक्त झाले.
अनेक विभागांचा अनुभव गाठीशी
सचिवपदावर बढती झाल्यानंतर २००३ साली अर्धकुंभमेळ्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. दरम्यानच्या काळात ते उच्चशिक्षणासाठी परदेशात गेले. २००६ साली त्यांची नियुक्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदी करण्यात आली. जलनिगम विभागाच्या सचिवपदीही त्यांनी काम पाहिले. यासह इतरही अनेक विभागांचा कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला आहे.
उत्पल कुमार सिंह यांची कार्यक्षमता आणि कुशलता पाहून त्यांना केंद्र सरकारमध्ये बोलावण्यात आले. कृषी मंत्रालयात त्यांची संयुक्त सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. बढती झाल्यानंतर त्यांनी अप्पर सचिवपदीही काम पाहिले. त्यानंतर २०१७ साली उत्तराखंड राज्याने माघारी बोलावून घेत राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी दिली होती.