लखनऊ (उत्तर प्रदेश) - लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप रविवारी पोलिसांनी फेटाळला. त्या तरुणाचा मृत्यू दुचाकीवरून खाली पडून जखमी झाल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आंबेडकर नगर जिल्ह्यातील टांडा भागात ही घटना घडली होती.
रिझवान असे मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वीच त्याला दुखापत झाली असून सेप्टीसीमियानेही पीडित होता असे टांडा पोलीस स्टेशनचे एसएचओ संजय कुमार पांडे यांनी सांगितले.
पाच दिवसांपूर्वी, मोटरसायकलवरून पडल्यानंतर रिझवान जखमी झाला. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय उपचारांनी तो बरा न झाल्याने त्याला दुसरीकडे रेफर केल्याचे संजय कुमार पांडे यांनी सांगितले.
त्यानंतर रिझवानचे वडील इस्राईल त्याला सामुदायिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले, तेथून डॉक्टरांनी त्याला १७ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात पाठवले आणि एक्स-रे काढायला सांगितले.
१७ एप्रिलला रात्री त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी रिझवानला दुखापत झाल्याचे आणि त्याला सेप्टीसीमियाचा त्रास होता, असे अहवालात नमुद केल्याचेही पांडे यांनी सांगितले.
परिसरातील काही जणांनी पोलिसांनी रिझवानला मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांनी मारहाण केल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही. कुटुंब, डॉक्टरांनीही अपघातात दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.