हैदराबाद - तेलंगाणामध्ये जोरदार पाऊस पडला असून जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 5 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे तेलंगाणा सरकारचा अंदाज आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच विज पूरवठा खंडीत झाला आहे. पूरस्थिती निर्माण झालेल्या इब्राहिमपटनम भागातील नागरिक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार किशन रेड्डी यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
आमदार किशन रेड्डी यांच्यावर नागरिकांनी चप्पला फेकल्या असून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. अशीच एक घटना हैदराबादच्या उप्पल मतदारसंघातही घडली आहे. आमदार सुभाष रेड्डी यांना स्थानिक महिलांनी चांगलेच धारेवर धरले. एका महिलेने तुमचे नाव लिहून आत्महत्या करू, अशी धमकीच आमदाराला दिली आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
तेलंगाणामध्ये पावसाने 7.35 लाख एकरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान एकूण 2 हजार कोटींचे असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेलगंणाजवळ असलेल्या कर्नाटकलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. हैदराबादमध्ये १९१६ नंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या संकटात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदतही तेलंगाणा सरकारने जाहीर केली आहे.