नवी दिल्ली - यंदा पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यांत निवडणूका होणार आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाममधील आगामी निवडणुकांमध्ये सर्व जागा लढवण्याचा निर्णय लोक जनशक्ती पक्षाने (लोजपा) घेतला आहे, अशी माहिती एलजेपीचे सरचिटणीस अब्दुल खलिक यांनी दिली.
अल्पसंख्याक समाजातील लोकांचा आवाज मजबूत करण्यासाठी पक्षातील नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. आम्ही राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करीत आहोत. पक्षाचा विस्तार आणि बळकटीकरण व्हावं असे त्यांना वाटतं. जेणेकरून आम्ही दुर्लक्षित आणि वंचित घटकांचा समस्या मांडू, असे खलिक म्हणाले.
येत्या निवडणुकीत आम्ही पश्चिम बंगाल आणि आसाममधील सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित केले आहे, असे ते म्हणाले.
पश्चिम बंगाल निवडणूक -
विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. राज्यात भाजपाने ममता बॅनर्जींच्या सरकारला आव्हान दिले आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला 211 जागा मिळाल्या होत्या तर भाजपला फक्त 3 जागा जिंकता आल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आसाम निवडणूक -
एप्रिल 2021 मध्ये आसामच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. आसाम विधानसभा निवडणूक 2016 मध्ये पार पडली होती. गेल्या निवडणुकीमध्ये आसाम विधानसभेमधील सर्व 126 जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील रालोआने 86 जागांवरील विजयासह सपशेल बहुमत मिळवले व आसाममधील कॉंग्रेस पक्षाची प्रदीर्घ सत्ता संपुष्टात आणली.