नवी दिल्ली - यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) गुरुवारी (२६ डिसेंबर) होणार आहे. हे ग्रहण भारत, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स, सउदी अरब आणि सिंगापूरमधून दिसेल. भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. याआधी नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० ला झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये.
२०१९ मध्ये याआधी 6 जानेवारी आणि 2 जुलैला खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. मात्र, या वेळी खग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. भारतात सूर्योदयानंतर दक्षिणेकडील भागातून याची कंकणाकृती पाहता येईल. तर, देशातील इतर भागांमध्ये काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहण जिथून दिसते त्यावेळी सर्व ठिकाणांहून एकाचवेळी ते दिसत असते. सूर्यग्रहणाचे तसे नसते. ते दिसण्याच्या वेळा स्थानपरत्वे थोड्याप्रमाणात बदलत असतात.
येथून दिसेल सूर्यग्रहण
दक्षिणेतील कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील कन्नानोर, कोयंबटूर, कोझीकोड, मदुरई, मंगलोर, ऊटी, तिरुचिरापल्ली येथून हे ग्रहण दिसेल. या भागांमध्ये सूर्याचा साधारण ९३ टक्के भाग चंद्राच्या सावलीमुळे झाकला जाणार आहे. महाराष्ट्रातून सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकले गेलेले दिसणार आहे.
सूर्य ग्रहणाची वेळ
भारतीय मानकानुसार खंडग्रास सूर्यग्रहण २६ डिसेंबरला सकाळी आठ वाजता सुरू होईल. तर, कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर, दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी ती संपेल. त्यानंतर दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी ग्रहणाची खंडग्रास स्थितीही संपेल.
मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहणमध्य सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्राच्या सावलीमुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.
सूर्यग्रहणादरम्यान या बाबींची काळजी घ्या
1. सूर्य ग्रहणादरम्यान उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहून नये. यामुळे सूर्याची अतिनील किरणे आणि इतर घातक परावर्तने थेट डोळ्यांवर पडतात. यामुळे डोळ्यांची हानी होते.
2. सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलर फिल्टर चश्म्याचाच वापर करावा.
3. सोलर फिल्टर चश्म्यांना सोलर-व्ह्युइंग ग्लासेस किंवा पर्सनल सोलर फिल्टर्स किंवा आयक्लिप्स ग्लासेस असेही म्हटले जाते.
4. असा चश्मा नसल्यास सूर्यग्रहण आजिबात पाहू नये.
5. सूर्यग्रहणादरम्यान सूर्याला पिनहोल, टेलेस्कोप किंवा दूर्बीणीतूनही पाहू नये.
ग्रहणाशी संबंधित धार्मिक बाबी
1. ग्रहण लागण्याच्या १२ तास आधीपासून सूतक काळ मानला जातो. तर, ग्रहण उतरल्यानंतर हे सूतक संपते.
2. सूतक काळात घरातील सर्व वस्तू आणि अन्नाच्या शुद्धीकरणासाठी त्यात तुळशीपत्र घातले जाते. तसेच, ग्रहणकाळात जेवतानाही तुळशीपत्र घालूनच अन्नाचे सेवन केले जाते. शक्यतो या काळात फलाहारच केला जातो.
3. ग्रहण काळातील अतिनील आणि घातक किरणे गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी घातक मानली जातात. त्यांनी या काळात घराबाहेर पडू नये, असे म्हटले जाते.
4. सूतककाळात मांसाहारी भोजन, मदिरा सेवन, असत्य भाषण निषिद्ध मानण्यात आले आहे. तसेच, ब्रह्मचर्य पालन करावे, असाही संकेत आहे.
5. ग्रहणकाळात सूर्याची उपासना आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो.
6. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात. तसेच, पूजा-अर्चा केली जात नाही. मात्र, या काळात परमेश्वराचे भजन-कीर्तन, धार्मिक पुस्तकांचे वाचन, मंत्रपठण करावे, असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे.
7. ग्रहण सुटल्यानंतर उपलब्ध असल्यास घरामध्ये गंगाजल शिंपडावे. तसेच, गरजू व्यक्तींना दानधर्म करावा, असे मानण्यात आले आहे. तसेच, वृक्षारोपणही करावे.
ग्रहणाशी संबंधित अंधश्रद्धा
1. ग्रहण काळात सुईमध्ये धागा ओवू नये; तसेच, कोणतीही वस्तू कापणे, छिलणे आदी कामे करू नये, अशी अंधश्रद्धा आहे.
2. ग्रहण काळात भोजन आणि पाण्याचे सेवन करू नये.
3. या काळात मल-मूत्र विसर्जन, दात घासणे, केस विंचरणे, अंघोळ करणे आदी कामे करू नयेत.
4. ग्रहण लागलेले असताना शुभकार्ये करू नयेत.
5. ग्रहणाआधी बनवलेले अन्न शिल्लक राहिल्यास ते फेकून द्यावे किंवा घरातील पाणी टाकून देऊन ताजे पाणी भरावे. ताजे अन्न शिजवून खावे आदी अनेक अंधश्रद्धा ग्रहणाशी जोडल्या गेल्या आहेत.