नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले होते. त्यांच्यावर मंगळवारी लोधी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यापूर्वी मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसेच इतर मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुखर्जींना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती.