रांची : चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. चाईबासा कोशागार प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांनी आपली अर्धी शिक्षा तुरुंगात पूर्ण केली असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला. सुनावणीदरम्यान लालू यांच्या वकीलांनी म्हटले की, 'चाईबसा कोषागार प्रकरणात त्यांना पाच वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. या शिक्षेपैकी अर्धी शिक्षा त्यांनी भोगली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे, त्यांना जामीन देण्यात यावा.' तर, सीबीआयकडून लालूंना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली. मात्र, न्यायालयाने लालूंच्या वकिलांचा युक्तीवाद मान्य करत जामीन मंजूर केला.
देवघर कोषागार प्रकरणात लालू प्रसादांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता चाईबासा प्रकरणात जामीन मिळाला असला, तरी दुमका कोषागार प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना अजूनही तुरुंगातच रहावे लागणार आहे. दुमका प्रकरणात त्यांना सीबीआय न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा दिली आहे.
हेही वाचा : कोरेगाव-भीमा प्रकरण : फादर स्टॅन यांना रांचीमधून अटक; एनआयएची कारवाई