गांधीनगर - मुंबईतील कोरोना कंन्टेन्मेंट भागातून कोरोना बाधित रुग्ण गुजरातच्या कच्छमध्ये आल्याचा दावा गुजरात प्रशासनाने केला आहे. त्यामुळे कच्छ प्रशासनाने आरोग्य सेवा, अतिरिक्त संचालक पुणे (IDSP) यांना पत्र लिहले आहे. कोरोनाग्रस्त भागातून प्रवास करत हा व्यक्ती गुजरातमध्ये आल्याचे पत्रात म्हटले आहे. कच्छ आरोग्य विभागाने हे पत्र लिहले आहे.
![kutch administration](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ktc_letter_0205newsroom_1588442203_1021.png)
मुबंईतील भांडूप भागातील कोरोनाग्रस्त प्रवासी असल्याचे तपासात पुढे आले आहे. मुंबईवरून जहाजाने हा व्यक्ती गुजरातमधील कच्छमध्ये आला होता. तो जहाजातील कर्मचारी असल्याचेही पत्रात म्हटले आहे. डेल्टा वॉटरवेज कंपनीच्या जहाजाने सर्वजण २९ एप्रिलला मुबंईवरून कच्छ येथील अदानी बंदावर आले होते. ३० एप्रिलला ते पुन्हा प्रवास करणार होते. मात्र, कच्छ प्रशासनाने त्यांची चौकशी केली. तसेच त्यांची तपासणी केली असता एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. हा कोरोनाग्रस्त व्यक्ती मुंबईतील कंन्टेन्मेंट भागातून प्रवास केल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार धक्कादायक असून महाराष्ट्र सरकारने कंन्टेन्मेंट भागातून प्रवास करण्याची परवानगी कशी दिली. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. तसेच यापुढे काळजी घेण्याची विनंती केली आहे.