नवी दिल्ली - केरळमधील कोझिकोड येथील विमान अपघातात जखमी झालेल्या ८५ प्रवाशांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पूर्णत: तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी (७ ऑगस्ट ) रात्री आठच्या सुमारास कोझिकोड विमान तळावर दुबईहून माघारी आलेले विमान कोसळले होते. या अपघातात वैमानिकांसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.
एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाईट दुबईवरून १९० प्रवाशांसह भारतात येत होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे लँडीग होत असताना विमान धावपट्टीवरून घसरले. धावपट्टीशेजारील ३५ फूट खोल दरीमध्ये विमान कोसळले होते. या अपघातात विमानाचे दोन तुकडे देखील झाले. 'वंदे भारत मिशन' अंतर्गत परदेशात अडकलेल्या प्रवाशांना भारतात आणण्याचे मिशन एअर इंडियाकडून सुरु आहे. या सेवेत असलेल्या विमानाचा अपघात झाला.
अपघातानंतर जखमी झालेल्या १४९ प्रवाशांना रुग्णालयात भरती केले असून २३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी(८ ऑगस्ट) सांगितले होते. IX-1344 या फ्लाईटमधील प्रवाशांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले होते.
आत्तापर्यंत ८५ प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस ही सेवा भारत सरकारच्या एअर इंडियाच्या मालकीची आहे. एअर इंडियाच्या ताफ्यात B737 श्रेणीची विमाने आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या १६ प्रवाशांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिल्याचे एअर इंडियाने रविवारी सांगितले आहे.