हैदराबाद - भारत-अमेरिकेचे द्विपक्षीय संबध कायमच चढ-उताराचे राहिले आहेत. १९५० च्या दशकात भारताला विरोध करण्यापासून ते २००५ साली पाठिंबा देण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. मात्र, आता दोन्ही देशांमध्ये चांगलीच मैत्री झाली आहे.
माहिती तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय सहकार्य करण्याबद्दल भारताचे योगादान अमेरिकेने मान्य केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषेदेत भारताला स्थायी सदस्यत्व देण्याचा विषय असो किंवा अणुकरार, अमेरिकेने भारताला कायमच सहकार्य केले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरही अमेरिकेने भारताला साथ दिली आहे.
१९९८ साली भारताने दुसऱ्यांदा अणुचाचणी केली. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिटंन २००० साली भारताच्या दौऱ्यावर आले होते. मात्र, अणुचाचणीवरून दोन्ही देशांतील संबधात दुरावा आला होता. क्लिंटन प्रशासनाने अणुचाचणी विरोधी करारावर हस्ताक्षर करण्यासाठी भारतावर दबाव आणला, मात्र, त्यात अमेरिकेला यश आले नाही.
जसे-जसे भारताच्या अर्थव्यवस्थेने गती पकडली. तसे शीतयुद्ध काळातील मित्र असलेल्या पाकिस्तानवरील अमेरिकेची नजर हटली आणि भारताकडे वळली. २००६ साली अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश भारतात आले, तेव्हा दोन्ही देशांनी मिळून बिगर लष्करी अणुकराराला अंतिम रुप दिले. याचबरोबर सुरक्षा आणि आर्थिक संबधांना बळकटी देण्याचे काम केले.
२००६ साली दोन्ही देशांत ४ हजार ५०० कोटी डॉलरचा व्यापार झाला. तो २०१० साली वाढून ७ हजार कोटी डॉलरवर पोहोचला. २७ एप्रिल २००७ साली हार्ले डेव्हिडसन दुचाकीवर भारत-अमेरिकेने तोडगा काढला. २०१० साली भारताचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ अमेरिकेत गेले. त्यावेळी पहिल्यांदा दोन्ही देशात अतिमहत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. नोव्हेंबर २०१० मधे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले. त्यांनी संयुक्त राष्ट्रात भारताला स्थायी सदस्यत्व देण्याच्या मागणीचे समर्थन केले.
२०१५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ओबामा पुन्हा भारतात आले. भारत अमेरिकेचा सर्वांत चांगला दोस्त बनू शकतो, असे वक्तव्य ओबामांनी केले. यावेळी ओबामा आणि पंतप्रधान मोदींनी अणुकरारातील अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याची घोषणा केली. तसेच संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी १० वर्षांसाठी सहकार्य करार केला.
येत्या २४ फेब्रुवारीला ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी दोन्ही देशांतील संबधांना नवी उर्जा मिळेल, अशी आशा आहे. भविष्याचा विचार करता चांगले संबध दोन्ही देशांना फायद्याचे ठरतील, असे परराष्ट्र तज्ज्ञांच मत आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील संबध आणखी मजबूत होतील.