तिरुवनंतपुरम् - लोक आपल्या विविध तक्रारी घेऊन पोलिसांकडे जातात. मात्र, केरळमधील पळोड येथे राहणाऱ्या एका महिलेने मात्र, पोलिसांना एक विनंती करणारे पत्र लिहिले आहे. पोलिसांनीही या विनंतीला प्रतिसाद देत या महिलेची मदत केली.
शशिकला नावाची ही महिला लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शेवटी हतबल झालेल्या या महिलेने पळोड पोलिसांकडे मदतीची विनंती केली. पोलिसांनी देखील तत्काळ या महिलेची मदत केली. त्यांनी या महिलेला दोन हजार रुपये रोख आणि काही जीवनावश्यक साहित्याची मदत दिली.
पेरिंगमाला परिसरात एका भाड्याच्या घरात या महिलेचे कुटुंब राहते. तिला दोन मुली आहेत. या मुलीचे शाळेतील ट्रान्सफर सर्टिफिकेट आणण्यासाठी सुद्धा या महिलेकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने पोलिसांना पत्र लिहून मदतीची विनंती केली. स्वत:कडे पैसे आल्यानंतर पोलिसांनी दिलेली रक्कम परत करण्याचे आश्वासनही या महिलेने या पत्रात दिले आहे.
पळोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश कुमार यांनी या महिलेचे पत्र वाचल्यानंतर लगेच तिला पोलीस ठाण्यात बोलावले. महिलेची आणि मुलींची स्थिती पाहून त्यांनी या महिलेला मदत केली.
पोलिसांप्रती असलेल्या आदर आणि विश्वासामुळेच त्यांच्याकडे मदत मागितली. अडचणीच्या प्रसंगी मदत करण्यासाठी नातेवाईक किंवा मित्र नसल्याने पोलिसच तिची मदत करू शकत होते, असे शशिकला यांनी सांगितले.