तिरूवअनंतपुरम - भारतात कोरोनाची पहिली रुग्ण ठरलेल्या महिलेला केरळच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तिच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांनंतर दुसऱ्यांदा जेव्हा तिच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, तेव्हा त्यात कोरोना विषाणू नसल्याचे निष्पन्न झाले.
याआधी अलापुज्झा आणि कासारगोड जिल्ह्यांमधील दोन विद्यार्थ्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. या महिलेवरील यशस्वी उपचारांनंतर, आता केरळमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण राहिला नसल्याचे निश्चित झाले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी याबाबत माहिती दिली.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अजूनही २,२४२ लोकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यामधील आठ रुग्णांना विशेष कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यातील तीन लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजताच, केरळ सरकारने राज्यात आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. मात्र, त्यांच्यावरील उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत, आणि रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत नसल्याचे स्पष्ट होताच, ती मागे घेण्यात आली होती.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत साधारणपणे २,११८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ७५ हजार लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : मोदी-ट्रम्प रोड शो : सत्तर लाख नव्हे, तर केवळ एक लाख लोक राहणार उपस्थित..