तिरुवनंतपुरम (केरळ) - सरकारी कार्यालयात लेखापरीक्षकाचे काम करणाऱ्या आरोपीनेच सरकारला दोन कोटींचा चुना लावला आहे. वांचियूरच्या सरकारी कोषागार कार्यालयातून दोन कोटी रुपये काढून घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपीला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. एमआर बिजुलाल असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी तिरुवनंतपुरमच्या सरकारी कोषागार कार्यालयात वरिष्ठ लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होता.
पोलिसांनी बिजूलालला नाट्यमयरित्या अटक केली आहे. हा आरोपी न्यायालयात शरण येण्यापूर्वी वकिलाच्या कार्यालयात पोहोचला होता. तेव्हा पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. पोलिसांनी चौकशी करण्यासाठी आरोपीला गुप्त ठिकाणी नेले आहे. आरोपीने जिल्हाधिकाऱ्याच्या खात्यामधून पैसे काढण्यासाठी निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचा पासवर्ड वापरला. त्यानंतर कोषागार कार्यालयाच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करत ऑनलाईन पैसे वळते करून घेतले. कोषागार अधिकाऱ्याला खात्यात घोटाळा झाल्याचे लक्षात येताच आरोपी अज्ञात ठिकाणी लपून बसला होता.
घोटाळा केल्याने केरळ पोलिसांनी वरिष्ठ लेखापरीक्षक असलेल्या आरोपीला सेवेतूनत तडकाफडकी काढून टाकले आहे. नुकतेच आरोपीने तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयात ई-फायलिंग करून जामीन मिळविण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालय पुन्हा उघडल्याने थेट जामिनाचा अर्ज करा, असे न्यायालयाने आरोपीला सांगितले होते.