तिरुवनंतपुरम् - देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर केरळमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. मात्र, तेथील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात यश आले असून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन काही जिल्ह्यांतील लॉकडाऊन उठवण्याचा विचार केरळ सरकार करत आहे.
केरळ सरकारने कोरोनाची सद्यस्थिती बघून, रेड, ऑरेंज-ए, ऑरेंज-बी आणि ग्रीन अशा गटात जिल्ह्यांची विभागणी केली आहे. कसारागोड, कन्नुर, कोझिकोड आणि मल्लापूरम् हे जिल्हे रेड झोनमध्ये असून ३ मे पर्यंत येथे लॉकडाऊन सुरू राहणार आहे. आळेप्पुझा, तिरुवनंतपुरम्, पलाक्कड, वायनाड आणि थ्रीसूर ऑरेंज-बी झोनमध्ये असून २० एप्रिलनंतर येथील संचारबंदी उठवली जाऊ शकते. पथामथित्ता, एर्नाकुलम आणि कोल्लमचा समावेश ऑरेंज-ए झोनमध्ये असून २४ एप्रिलनंतर येथील संचारबंदी काढली जाण्याची शक्यता आहे.
कोट्टयाम आणि इदु्क्की ग्रीन झोनमध्ये असून तेथे २० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहिल. त्यानंतर लॉकडाऊन काढला जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार केरळमध्ये आत्तापर्यंत ३९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील २४५ रुग्ण बरे झाले आहेत. ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.