जबलपूर- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दोन भाजप नेत्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये भाजपा उपाध्यक्ष प्रभात झा आणि प्रदेशाध्यक्ष वी.डी.शर्मा यांचा समावेश आहे. दोन्ही नेत्यांनी कमलनाथ यांच्यावर चिनी कंपन्यांना झुकते माप देत आयात शुल्क कमी केल्याचा आरोप केला होता.
भाजपा नेत्यांनी कमलनाथ यांच्याविषयी आपत्तीजनक वक्तव्ये केली होती. राज्यातील वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रिक माध्यमामंध्ये 26 आणि 27 जूनला भाजपा नेत्यांनी केलेल्या आरोपांविषयी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. यामुळे भाजपा नेत्यांना मंगळवारी नोटीस पाठवले आहे, असे कमलनाथ यांचे वकील वरुण तन्खा यांनी सांगितले. कमलनाथ यांच्यावतीने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कमलनाथ यांच्या वकिलांनी दिला आहे.
भाजपा नेत्यांनी केलेल्या आरोपांना कोणताही कागदोपत्री आधार नाही. त्यांचे आरोप निराधार आहेत, असे तन्खा यांनी म्हटले. कमलनाथ यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून 2004 ते 2009 या कालावधीत नियमांचे पालन करुन निर्णय घेतले होते, असे त्यांनी सांगितले. याकालावधीत चिनी कंपन्यांवर लावलेले आयात शुल्क जास्त होते. त्यामुळे कमलनाथ यांनी चीन किंवा अन्य कोणत्याही देशातील कंपन्यांना झुकते माप दिले नाही, असे स्पष्ट होते, असे तन्खा म्हटले.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीनंतर आयात शुल्क कमी करणे किंवा वाढवणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, असे तन्खा यांनी सांगितले. भाजप नेत्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनवर चिनी कंपन्यांकडून निधी स्वीकारल्या बद्दल केलेले आरोपही निराधार आहेत, असे तन्खा यांनी म्हटले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष शर्मा यांनी कमलनाथ यांनी सर्व निधी छिंदवाडा या त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी वापरल्याचा आरोप केला होता, तोही निराधार आहे, असे तन्खा म्हणाले आहेत. शर्मा यांनी केलेल्या आरोपांना कोणताही कागदोपत्री आधार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशात होणाऱ्या 24 मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाची लोकप्रियता घटत आहे. त्यामुळे कमलनाथ यांच्या टीका केली जात आहे, असे देखील नोटीस मध्ये म्हटले आहे.