श्रीनगर : सक्तवसुली संचलनालय म्हणजेच, ईडीने सोमवारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी बोलावले आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट बोर्डामध्ये झालेल्या घोटाळ्यासंबंधी चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी फारुख अब्दुल्ला होते, तेव्हा ४३ कोटींचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी बँक दस्तावेजांच्या आधारावर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
यापूर्वी २०१९मध्ये याप्रकरणी ईडीने अब्दुल्लांची चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांना समन्स पाठवण्यात आले आहे. तसेच, याप्रकरणी ४ सप्टेंबरला ईडीकडून क्रिकेट बोर्डाचे माजी खजिनदार अहसान मिर्झा यांनाही अटक करण्यात आली होती.
हे तर सूडाचे राजकारण..
यावर प्रतिक्रिया देत फारुख अब्दुल्लांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी हे सूडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तसेच फारुख यांना बजावण्यात आलेल्या समन्सला पक्षातर्फे लवकरच उत्तर देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी