कुलगाम (जम्मू) - कुलगाम जिल्ह्यातील वानपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. त्यांच्याविरोधात पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त दल कारवाई करीत आहे. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. येथील पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संयुक्त पथकाद्वारे या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली होती. यावेळी जवानांच्या पथकावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यावर ही चकमक सुरू झाली होती. त्यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, याभागात आणखी दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई सुरूच आहे.
जगभरात कोरोनाचे संकट आलेले असतानाही पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर उपद्व्याप सुरूच आहेत. तसेच, दहशतवादी कारवायाही सुरू आहेत. मात्र, भारतीय लष्कर याला चोख प्रत्युत्तर देत आहे. कुलगाम जिल्ह्यातच सोमवारी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.