रांची - झारखंडच्या विधानसभा भवनाला बुधवारी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे या भागात मोठा गोंधळ माजला होता. विधानभवनात आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल 3 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हे झारखंडचे नवे विधानसभा भवन आहे.
लाखोंचे नुकसान
विधानसभा भवनात लागलेल्या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांची कार्यालये आहेत. ती पूर्णपणे जळून खाक झाली. येथील सोफे, गाद्या, लाकडी छत आदी सर्व जळून गेले.
नव्या विधानसभा भवनाला आग लावण्याचे कारस्थान?
या नव्या विधानसभा भवनात 10 डिसेंबरला सर्व कामकाज हलवण्यात येणार होते. याआधीच ही मोठी दुर्घटना घडली आहे. याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने कट रचून जाणीवपूर्वक ही आग लावण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. मंगळवारीच विधानसभेच्या सचिवांनी याची पाहणी केली होती. मात्र, या प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिक्रिया किंवा माहिती दिलेली नाही. अंधारामुळे विधानसभा भवनाचे नेमके किती नुकसान झाले आहे, हे समजू शकलेले नाही. येथे अग्निशमन पथकाशिवाय काही अधिकारीही उपस्थित होते. काही लोक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगत आहेत.
पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन
ही आग कशी लागली, याच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. झारखंड राज्याच्या स्थापनेनंतर 18 वर्षांनी राज्याला नवे विधानसभा भवन मिळाले आहे. या वर्षी 12 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडच्या नव्या विधानसभा भवनाचे उद्घाटन केले होते. राज्याच्या स्थापनेनंतर आतापर्यंत भाड्याच्या जागेत विधानसभेची कार्यवाही चालत होती.