श्रीनगर - काँग्रेस नेते राहुल गांधींनी काश्मीरमध्ये हिंसक वातावरण पेटल्यासंबंधी टिप्पणी केली होती. यावर येथील राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 'काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल यांना काश्मीर खोऱ्याचा दौरा घडवण्यासाठी आणि जमिनीवरील वस्तुस्थिती दाखवण्यासाठी खास विमान पाठवू, राहुलजी, स्वतः या आणि पहा,' असा टोला लगावला आहे.
'मी स्वतः राहुल गांधींना काश्मीरला आमंत्रित करत आहे. मी तुमच्यासाठी खास विमान देतो. त्यातून तुम्हाला काश्मीर पाहता येईल. आधी पाहा आणि मग बोला,' असे मलिक यांनी म्हटले आहे. 'तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. तुम्ही अशी वक्तव्ये करू नयेत,' असेही ते म्हणाले.
शनिवारी राहुल गांधींनी जम्मू-काश्मीरमधून हिंसेच्या बातम्या ऐकायला मिळत असल्याचे म्हटले होते. आर्टिकल ३७० रद्द करण्यात सांप्रदायिक दृष्टीकोन नसल्याचे स्पष्ट केले आहे. 'आर्टिकल ३७० रद्द करण्याचा निर्णय प्रत्येकासाठी होता. येथे लेह, कारगिल, जम्मू, राजौरी-पूंछ किंवा इतर काश्मीर खोऱ्यासाठी सांप्रदायिक दृष्टिकोन ठेवण्यात आला नव्हता,' असे राज्यपाल म्हणाले.
'येथे परदेशातील मीडियानेही शोध घेण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासाठी सर्व रुग्णालये खुली आहेत. एका जरी व्यक्तीला गोळी लागल्याचे तुम्ही म्हणत असाल तर, सिद्ध करून दाखवा, असा इशारा त्यांना देण्यात आला होता. तसेच, दंगा भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४ व्यक्तींना पायात गोळी मारण्यात आली आहे, हे आम्ही स्वतः जाहीर केले आहे. त्यापैकी कोणीही गंभीर जखमी नाही,' असे मलिक यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर ही छळछावणी (कॉन्सन्ट्रेशन कॅम्प) बनली आहे, या आरोपाला उत्तर देताना मलिक यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील आणीबाणीचा दाखला दिला. 'मला हे सर्व काय चालले आहे, ते माहीत आहे. मी स्वतः ३० वेळा तुरुंगात गेलो आहे. तरीही, मी तुरुंगांना छळछावणी म्हणत नाही. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात अनेकांना एक ते दीड वर्षांपर्यंत अनेकांना कोठडीत टाकले होते. मात्र, त्याला कोणीही छळछावणी म्हटले नाही. 'प्रतिबंधात्मक अटक' करण्याच्या कारवाईची छळछावणीशी तुलना होऊ शकते का,' असा सवाल मलिक यांनी केला आहे.