नवी दिल्ली - लडाख आणि जम्मू काश्मीरबद्दल चीनने वक्तव्य केल्यानंतर भारताने आज त्याला प्रत्युत्तर दिले आहे. 'जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग असून वेळोवेळी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चीन भारताच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप करू शकत नाही, त्यांच्याकडे भारताच्या अंतर्गत विषयांत नाक खुपसण्याचा कोणताही अधिकार नाही', असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेश सुद्धा भारताचे अविभाज्य अंग आहे. ही गोष्ट चीनच्या वरिष्ठ नेतृत्वाला विविध मंचांवर स्पष्टपणे सांगण्यात आली आहे, असे शर्मा म्हणाले.
२+२ भारत अमेरिका चर्चा
भारत अमेरिकेत येत्या काही दिवासांत परराष्ट्र मंत्री स्तरावरील 2+2 चर्चा होणार आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता श्रीवास्तव म्हणाले, ही चर्चा लवकरात लवकर आयोजित व्हावी, अशी भारताची ईच्छा आहे. या चर्चेचे आयोजन नवी दिल्लीत व्हावे, यासाठी प्रयत्न चालू आहेत.
पाकिस्तानवर प्रतिक्रिया
पाकिस्तानही भारताच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप करत असून अनेक वेळा वक्तव्य करत आहे. पाकिस्तान सरकार अपयश लपविण्यासाठी भारताचे नाव घेत असून त्यांच्या जनतेची दिशाभूल करत आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.
पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेवर मे महिन्यापासून तणावपूर्ण वातावरण आहे. लडाखमधील भारतीय हद्दीत चिनी लष्कराने अतिक्रमण केले असून भारतानेही प्रत्युत्तर म्हणून मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता हिवाळ्याच्या तोंडावर भारतीय लष्कर चीनचा सामना करण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहे. भारतीय लष्कराने सीमेवर रणनिती आखल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही देशांत युद्धाची वेळ आली तर त्या दृष्टीने सर्व संसाधंनांची जुळवाजुळव लष्कराकडून सुरू आहे.