नवी दिल्ली - जामिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांना ग्रंथालयात घुसून मारहाण करणाऱ्या पोलिसांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या संबधीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. गुन्हे शाखेद्वारे मारहाण करणाऱ्या पोलिसांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कधी झाली होती विद्यार्थ्यांना मारहाण?
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात १५ डिसेंबरला जामिया विद्यापीठात आंदोलन सुरू होते. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांवर दगडफेक झाली होती. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यावेळी विद्यापीठात घुसून ग्रंथालयात बसलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
त्या दिवशी तैनात असलेल्या पोलिसांची माहिती घेण्यास गुन्हे शाखाने सुरूवात केली आहे. पोलिसांची ओळख पटवण्यासाठी दक्षिण जिल्हा पोलीस विभागाची मदत घेतली जात आहे. १५ डिसेंबरला कोणते पोलीस कर्मचारी कामावर होते याची माहिती मागवली आहे. तसेच कोणत्या ठिकाणी पोलिसांची ड्यूटी होती त्यानुसार तपास करण्यात येणार आहे.
पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
जामिया हिंसाचारप्रकरणी अद्याप पोलिसांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाई करण्यासाठी जामिया विद्यापीठाने तक्रारही दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलीस अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकारी याविषयी अद्याप काहीही बोलण्यास नकार देत आहेत.