नवी दिल्ली - देशातील स्वच्छता सर्वेक्षण-2020 मध्ये पुन्हा इंदूर विजयी झाले आहे. सलग चौथ्यांदा इंदूर शहराने पहिला क्रमांक पटकावला. देशातील सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून आज मध्य प्रदेशमधील इंदूरची घोषणा करण्यात आली. तर गुजरातमधील सूरत हे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. हरदीप सिंग पुरी यांनी टि्वटच्या माध्यमातून स्वच्छता सर्वेक्षण-2020 ची घोषणा केली.
शुभेच्छा! इंदूर शहर सलग चौथ्यावेळेस देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. या शहरातील लोकांनी स्वच्छतेप्रती आपले समपर्ण दर्शवले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाने आणि शहरातील नगरपालिकांनी चांगले कार्य केले आहे, असे टि्वट हरदीप सिंग पुरी यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रहिवाशांचे अभिनंदन केले. इंदूरने स्वच्छतेचा चौका लावला आहे, आता इंदूर षट्कारही लावेल, असे ते म्हणाले.
गंगा नदीवर वसलेल्या प्राचीन पवित्र शहर वाराणसीने नदीवर वसलेल्या शहरांपैकी सर्वांत स्वच्छ शहराचा किताब पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे येथील लोकांना शहर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा मिळाली, असेही सिंग यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण -2020 अंतर्गत देशातील 4242 शहरांनी भाग घेतला होता, ज्यात शहरांची स्वच्छता होण्यापूर्वी स्वच्छतेचे संस्थात्मककरण आणि नागरी सुविधांची उपलब्धता यांचा समावेश होता.