लडाख - भारत-चीन सीमावाद मागील तीन ते चार महिन्यांपासून चिघळलेला असून अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीनंतर तणाव आणखी वाढला आहे. त्यातच चीनने ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा परिस्थितीतही लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहे. मागील पाच दिवसांपासून लडाखमधील चुशुल सेक्टरमध्ये दोन्ही लष्कराच्या ब्रिगेड स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
२९/३० ऑगस्टच्या रात्री चीनने पँगाँग सरोवराच्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने चीनचा हा प्रयत्न उधळून लावला. सीमा वादावर चर्चा सुरू असताना चीनने जबाबदारपणे वागावे, असा इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नुकताच चीनला दिला आहे. तर दुसरीकडे भारतानेच चीनच्या भुमीत घुसखोरी केल्याचा आरोप चीनने केला आहे.
सीमेवरील परिस्थिती गंभीर असतानाही लष्करातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. चुशुल सेक्टरमध्ये खुल्या परिसरामध्ये ही बैठक सुरू आहे. सर्वसामान्यपणे लष्कराच्या टेन्टमध्ये (तंबू) चर्चा होत असते. मात्र, आता पहिल्यांदाच खुल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून भारत चीनमध्ये चर्चेचं घोंगडं तसेच भिजत पडले आहे. सीमेवर 'जैसे थे' स्थिती करण्यास चीन तयार नाही. त्यामुळे चर्चा बारगळली आहे.
एप्रिल- मे महिन्यापासून भारत चीन सीमेवर तणाव सुरू आहे. गलवान खोरे, पँगाँग लेकसह इतर अनेक भागात चीनने दावा केला आहे. तसेच भारताच्या सीमेवरील रस्त्यांनाही चीनने आक्षेप घेतला आहे. गलवान खोऱ्यात चिनी आणि भारतीय जवानांच्या मारहाणीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे.