नवी दिल्ली - कोरोनाशी लढणाऱ्या सर्व योद्ध्यांना आज देशाच्या वायुसेनेकडून मानवंदना दिली जाणार आहे. वायुसेनेकडून रुग्णालयांवरुन उड्डाण करत वैद्यकीय कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही मानवंदना दिली जात आहे. वायुसेनेच्या दोन सी-१३०जे हर्क्यूलस स्पेशल ऑपरेशन विमानांनी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील दल तलावावरून उड्डाण करण्यास सुरुवात केली. ही विमाने अशीच मानवंदना वाहत केरळच्या तिरुवअनंतपुरम पर्यंत जाणार आहेत.
यासोबतच वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्समधून देशाच्या विविध भागांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कोरोनासाठी नेमण्यात आलेल्या रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांपैकी ठराविक रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या बाहेर उभे करत, त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यामध्ये मुंबई, दिल्ली, हैदराबाद, लेह-लदाख, गोवा, पंचकुला, विशाखापट्टणम, लखनऊ, चेन्नई, पाटणा, भोपाळ, बंगळुरू, भुवनेश्वर यांसह इतर काही शहरांमधील रुग्णालयांचा समावेश होता.