नवी दिल्ली - कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताने एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. ह्या चाचण्या 612 प्रयोगशाळेत करण्यात आल्याचे आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितले.
जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी फक्त एकच प्रयोगशाळा होती. त्यानंतर 28 फेब्रुवरीला आपल्याकडे 14 प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. 31 मार्चला देशातील प्रयोगशाळेचा आकडा वाढून 125 झाला. मात्र, आज संपुर्ण भारतामध्ये एकूण 612 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 430 ह्या सार्वजनिक तर 182 ह्या खासगी प्रयोगशाळा आहेत. तसेच गेल्या काही महिन्यात कोरोना चाचणी वाढली असून दररोज १.१ लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात येत आहे.
जगाच्या तुलनेत भारताचे मृत्यूचे प्रमाण कमी असून रुग्ण बरे होण्याचा दरही चांगला आहे. सध्या 41.61 हा रुग्ण बरे होण्याचा दर आहे. तर 2.87 हा कोरोना मृत्यूचा दर आहे. दरम्यान स्थलांतरित कामगारांच्या त्वरित चाचणीसाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचे भार्गव यांनी सांगितले.