बंगळुरू - कर्नाटकात बुधवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल आज आला आहे. यामध्ये त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती, असे निष्पन्न झाले आहे.
केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७वर पोहोचली आहे.
केरळच्या तिरुवअनंतपूरम, थ्रिस्सूर आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. यामधील दोघे दुबई आणि कतारमधून परतले होते.
यासोबतच, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यामधील पुण्यामधील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता, तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून आल्याची माहिती मिळत आहे.
तसेच, कर्नाटकमध्ये कोरोनाचा २६ वर्षीय रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. हा रुग्ण ग्रीसवरून परतल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यासोबतच, या रुग्णाला विशेष कक्षामध्ये ठेवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण मुंबईचा रहिवासी आहे. सहा मार्चला तो ग्रीसवरून मुंबईत आला होता. त्यानंतर आठ मार्चला तो विमानाने बंगळुरूला आला, आणि नऊ मार्चला त्याने आपल्या ऑफिसमध्येही हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या चार जवळच्या मित्रांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा भाऊ बंगळुरूमध्ये राहत असून, त्याचे आई-वडील आणि पत्नी मुंबईमध्ये राहतात.
त्याच्या कुटुंबीयांबाबत तसेच बंगळुरूमध्ये त्याने फिरण्यासाठी जी रिक्षा वापरली. रिक्षाचालकाबाबत माहिती काढण्यात आली असून, त्यांनाही निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विषाणूबाबत सरकार पूर्णपणे सतर्क असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी लोकांना 'घाबरून जाऊ नका. मात्र, खबरदारी बाळगा' असा सल्लाही दिला आहे.
हेही वाचा : घाबरून जाऊ नका, मात्र खबरदारी घ्या; पंतप्रधानांचा देशवासियांना सल्ला