नवी दिल्ली - देशात कोरोना चाचणी क्षमता आणि प्रयोग शाळा वाढवल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने सांगितले. कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत 18 मे ला भारताने एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत.
दोन महिन्यांपूर्वी सुरवातीला एका दिवसामध्ये फक्त 100 कोरोना चाचण्या केल्या होत्या. यामध्ये केवळ 60 दिवसांत 1000 पट वाढ झाली आहे. संशोधन संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, चाचणी प्रयोगशाळा, मंत्रालये, विमान कंपन्या आणि टपाल सेवा, अशा एकत्र काम करणाऱया संघटनामुळे हे शक्य झाले आहे. जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी फक्त एकच प्रयोगशाळा होती. मात्र, आज संपुर्ण भारतामध्ये एकूण 555 प्रयोगशाळा आहेत.
लॉकडाऊन दरम्यान 'मिशन लाइफलाईन उडान’ अंतर्गत देशभरात 150 विमानांमार्फत सुमारे 40 टन चाचणी सामग्रीसह वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाविरुद्धत्या भारताच्या लढाईस पाठिंबा देण्यासाठी देशातील दुर्गम भागात आवश्यक वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडून हे मिशन चालवण्यात आले आहे.