मुंबई - एकापाठोपाठ एक नवनवीन विक्रम करत संपूर्ण जगाला आश्चर्याचे धक्के देणारी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो. 15 ऑगस्ट 2019 ला इस्त्रोच्या स्थापनेलाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण, एकेकाळी उपग्रहाला आणि रॉकेटचे सूटे भाग यांना बैलगाडीवरून नेणाऱ्या इस्त्रोची संघर्षगाथा पाहणार आहोत.
![isro logo](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4149016_d.jpg)
इस्त्रोच्या निर्मीतीचा प्रवास
दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धातील प्रमुख अमेरिका आणि रशिया या राष्ट्रांत अंतराळातील संशोधनातही स्पर्धा होती. या स्पर्धेतून जगातील इतर देशही प्रभावीत झाले होते. भारताचे अंतराळ मोहिमेचे जनक शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांनी याबाबत भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाबाबत महत्वपूर्ण चर्चा केली. यानंतर भारताच्या अणुऊर्जा विभागाने 16 फेब्रुवारी 1962 ला अंतराळ संशोधन राष्ट्रीय समितीची स्थापना केली. समितीच्या कार्याचा वाढता व्याप पाहून 15 ऑगस्ट 1969 रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो या पूर्णवेळ संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली.
![isro](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4149016_b.jpg)
इस्त्रोचा 50 वर्षांचा खडतर प्रवास
नुकतेच भारताने चांद्रयान - २ चे यशस्वी प्रक्षेपण केले, यानंतर हे यान आता यशस्वीपणे घौडदौड करत आहे. या मोहीमेत एक बाब विशेष होती, ते म्हणजे हे चांद्रयान आणि त्याचे प्रक्षेपक यान हे दोन्ही भारतीय बनावटीचे होते. पण एक काळ असा होता, की इस्त्रोला आपला एक उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी कित्येक दिवस दुसऱ्या राष्ट्रांच्या सहकार्यावर अवलंबून रहावे लागले होते. इतकेच नाही तर प्रारंभी संसाधनांच्या अभावामुळे 1981 मध्ये 'अॅप्पल' या उपग्रहाला बैलगाड्यांमधून नेण्यात आले होते. या उपग्रहाचे आणि त्याच्या रॉकेटच्या खुल्या भागांचे वहन करण्यासाठीही इस्त्रोच्या संशोधकांनी बैलगाडी आणि सायकलींचा वापर केला होता.
दिनांक 15 फेब्रुवारी 2017 रोजी इस्त्रोने एकाच वेळी 104 उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करून एक विक्रम केला, आजही तो विश्वविक्रम भारताच्या नावावर आहे. पण यातील एक महत्वाची बाब म्हणजे या उपग्रहात सर्वाधिक उपग्रह हे दुसऱ्या देशांचे होते. भारताची अवकाश संशोधनातील ही गरूडझेप जगातील लहान मोठ्या सर्वच देशांसाठी आदर्शवत अशीच आहे.
![isro](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4149016_172_4149016_1565943972869.png)
इस्त्रोचे आजपर्यंतचे सुवर्ण यश
- इस्रोचे देशभरात एकूण सहा प्रमुख केंद्रे आणि इतर अनेक युनिट्स, संस्था, सुविधा आणि प्रयोगशाळा आहेत.
- इस्त्रोने आर्यभट हा भारताचा पहिला उपग्रह १९ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या मदतीने अंतराळामध्ये प्रक्षेपित केला गेला होता.
- भारताच्या पहिल्या प्रक्षेपक वाहनाचे नाव एसएलव्ही -3 होते, 18 जुलै 1980 त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
- एसएलव्ही -3 व्यतिरिक्त भारताचे एएसएलव्ही, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) आणि जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन (जीएसएलव्ही) आदी प्रक्षेपक वाहन आहेत.
- १९८१ मध्ये संसाधनांच्या अभावामुळे अॅपल उपग्रहाला बैलगाड्यांमधून नेण्यात आले होते.
- SLV ३ हा भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह होता आणि या प्रकल्पाचे संचालक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे होते.
- इस्त्रोने आजपर्यंत स्वतःचे ८६ उपग्रह भारतातून प्रक्षेपित केले आहेत, तसेच २१ वेगवेगळ्या देशांमधून ७९ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
- अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान, चीन यासह भारत जगातील ६ वा देश आहे ज्याच्याकडे जमिनीवर उपग्रह तयार आणि लॉन्च करण्याची क्षमता आहे.
- 15 फेब्रुवारी 2017 रोजी इस्त्रोने एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत एक नवा इतिहास घडविला आहे.
- भारताची पहिली मंगळ मोहीम, मंगळयान हे 5 नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.
इस्त्रोची चांद्र मोहिम
- 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताचे चांद्रयान 1 चे प्रक्षेपण करण्यात आले.
- 14 जुलै 2019 रोजी भारताने चांद्रयान 2 या यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून, हे भारताचे ऐतिहासिक पाउल असणार आहे.
मिशन आदित्य
- 2020 या वर्षाच्या पहिल्या सहमाहित भारत, सुर्याच्या अभ्यासासाठी आदित्य हे यान पाठवणार आहे.
चंद्र, मंगळ आणि आता सुर्याला गवसणी घालण्यासाठी सज्ज होत असलेली भारतीय अवकाश संशोधन संस्था आज जगातील प्रमुख अवकाश संशोधन संस्थांपैकी एक आहे. इस्त्रोच्या यशाची संघर्षगाथा ही आज जगासाठी प्रेरणादायी आणि भारतीयांसाठी गौरवाभिमास्पद आहे.