नवी दिल्ली - चीनने आज (दि. 6 ऑगस्ट) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्या अंतर्गत विषयात चीनचा हस्तक्षेप आम्हाला अजिबात मान्य नाही, असे म्हणत भारताने चीनला फटकारले आहे.
जम्मू-काश्मीर या भारताच्या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) चर्चा करण्याचा प्रयत्न केला. चीनने यापूर्वीही असे प्रयत्न केले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायातून त्यांना हवा तसा पाठिंबा मिळाले नसल्याने चीन तोंडघशी पडले होते.
बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने चीनच्या समर्थनाने काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. कालच जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. चीन-पाकिस्तानचा हा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. भारत-चीनमध्ये पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती असताना चीनने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.